Published On : Wed, Sep 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मारबत महोत्सव: भक्तीच्या सुरात अन् संस्कृतीच्या सुगंधात न्हाऊन निघाले नेहरू पुतळा चौक परिसर

Advertisement

मारबत महोत्सव: भक्तीच्या सुरात अन् संस्कृतीच्या सुगंधात न्हाऊन निघाले नेहरू पुतळा चौक परिसर

नागपूर: संस्कृतीचा अनमोल वारसा आणि परंपरेचे सोनेरी धागे विणत नागपूर नगरीत सध्या मारबत महोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक व पारंपरिक महोत्सवाच्या अंतर्गत मंगळवारी (ता. ८) संध्याकाळी नेहरू पुतळा, मस्कासाथ परिसर भक्तिभावाच्या आणि संगीताच्या अथांग सुरात पूर्णपणे न्हाऊन निघाला. नागपूर महानगरपालिका आणि श्री काली मारबत उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने आयोजित भव्य ‘भजनसंध्या’ कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक किशन भगत यांच्या सुरेल व ओघवत्या आवाजाने उपस्थितांच्या मनाचा ताबा घेतला.

याप्रसंगी महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) गटनेते तथा काली मारबत उत्सव समितीच्या संयोजिका श्रीमती आभा पांडे, सतरंजीपुरा झोन सभापती श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेवक श्री. संतोष (रामभाऊ) आंबुलकर, नगरसेवक श्री. तुषार लारोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर तसेच काळी मारबत उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. गौरव हारडे यांच्यासह समितीचे तमाम पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मारबत महोत्सव: भक्तीच्या सुरात अन् संस्कृतीच्या सुगंधात न्हाऊन निघाले नेहरू पुतळा चौक परिसर

उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मारबत महोत्सवाच्या या विस्तारित स्वरूपावर अत्यंत सुंदर शब्दांत भाष्य केले. त्या म्हणाल्या, “नागपूरच्या जुन्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा केवळ आपल्यापुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर पोहोचायला हवा, हाच या महोत्सवामागचा मूळ उद्देश आहे. पूर्वी केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणारा हा मारबत उत्सव यंदा मनपातर्फे सलग चार-पाच दिवस विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून एका भव्य महोत्सवाच्या रूपात साजरा होत आहे.” या आयोजनात मोलाचा हातभार लावणाऱ्या प्रत्येक घटकाचे त्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

Advertisement

भक्तीच्या सुरांनी दुमदुमला परिसर: किशन भगत यांचे मंत्रमुग्ध करणारे गायन

संध्येच्या या दिव्य कार्यक्रमाची सुरुवात गायक किशन भगत यांनी विघ्नहर्ता श्री गणेशाच्या अथांग आराधनेने केली. ‘बाबा गणपती की आई फौज’ आणि ‘मोहे अंगना गजानन आयो रे’ या सुरेल व उत्साही भक्तिगीतांनी अवघा परिसर दुमदुमून गेला.

यानंतर एकापाठोपाठ एक सादरीकरण झालेल्या ‘बस इतनी कृपा करना, मेरा वक्त सुधार जाए’, ‘मैं भोले का दीवाना’ आणि ‘मुझको बस महाकाल बाबा चाहिए’ यांसारख्या भावपूर्ण रचनांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. या अफाट संगीतमय आणि भक्तीमय सादरीकरणाने उपस्थित प्रत्येक जण भक्तीच्या सागरात तल्लीन होऊन गेला आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत या संध्येचा मनसोक्त आनंद घेतला.

या ऐतिहासिक व भक्तीमय सोहळ्यात नागपूरच्या समृद्ध संस्कृतीचे अहोरात्र जतन करणाऱ्या ‘काळी मारबत उत्सव समितीचे अध्यक्ष’ श्री. गौरव हारडे तसेच समितीच्या सर्व सदस्यांचा महानगरपालिकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. महापौर श्रीमती निता ठाकरे व स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.