नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ऑटोचालकासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, टोळीतील इतर सदस्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पहिली घटना ४ ऑगस्ट रोजी घडली. सावंगी मोहपा येथील ६५ वर्षीय पुष्पा लक्ष्मीकांत बागडे या नागपूर बसस्थानकावरून वसंतनगर येथे जाण्यासाठी ऑटोमध्ये बसल्या होत्या. ऑटोमध्ये यापूर्वीच दोन महिला बसलेल्या होत्या. प्रवासादरम्यान आरोपींनी त्यांची नजर चुकवून बॅग कापली आणि सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.
दुसऱ्या घटनेतही महिलेचे दागिने गायब झाले. ६८ वर्षीय जयश्री देवीदास बंबाड या पतीसोबत नरखेडहून नागपूरला आल्या होत्या. बसस्थानकावरून ऑटोमध्ये बसताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची मणी असलेली चेन तुटली होती. त्यांनी ती पर्समध्ये ठेवली. गणेशपेठ बसथांब्यावर उतरल्यानंतर पर्स तपासली असता सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची मणी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या दोन्ही प्रकरणांचा तपास करताना गणेशपेठ पोलिसांनी मोहम्मद इकरान बख्तियार अहमद, रीना बंटी पात्रे आणि कीर्ती गोविंद खडसे यांना अटक केली आहे.
पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी करणारे हे संघटित टोळीचे सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास पथके कामाला लागली आहेत.





