
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आजमी यांच्या न्यायालयाने शेख शहजाद शेख शाहिद (१९), रा. वागदरा, इसासनी याला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीला नेले खोलीत-
अभियोजन पक्षाच्या माहितीनुसार, ३ मे २०२४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने घराजवळ राहणाऱ्या चार वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला परिसरातील एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी ९ मे २०२४ रोजी शहजादला अटक केली.
साक्षीदार आणि पुराव्यांमुळे आरोप सिद्ध-
पोलिसांनी तपासादरम्यान आवश्यक पुरावे गोळा करून साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने सादर केलेले दस्तऐवजी पुरावे, पोलिस तपास आणि साक्षीदारांचे जबाब यांचा न्यायालयाने विचार केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
पोलिस आणि अभियोजन पक्षाची प्रभावी बाजू-
पोलिसांच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी आरोपपत्र दाखल केले. अभियोजन पक्षातर्फे अधिवक्ता आसावरी परसोडकर यांनी प्रभावी बाजू मांडली. हवालदार नितीन सिरसाट आणि गुरुदास ताडपल्लीवार यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.
या निकालामुळे अल्पवयीन मुलांवरील गंभीर लैंगिक गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.




