Published On : Mon, Jul 29th, 2019

नागपूरच्या नेत्यांचा “दर्जा’ उंचावला

नागपूर:- राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भाजपच्या नेत्यांचाही दर्जा उंचावला आहे. नागपूरमधील एका आमदारासह चार पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे.

नुकतीच नगरसेवक अविनाश ठाकरे यांची ओबीसी महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी मंत्रालय झाल्याने या महामंडाळाचा अध्यक्ष याच खात्याच मंत्री असतो. त्यामुळे उपाध्यक्षास राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांची लघुद्योग विकास महांमडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पश्‍चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख आणि विधान परिषदेचे सदस्य गिरीश व्यास यांना प्रतोद करून त्यांनाही राज्यमंत्र्यांचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. असंघटित कामगारकल्याण महामंडाळावर सुरुवातीपासूनच मुन्ना यादव आहेत.

वनराज्यमंत्री तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके मूळचे नागपूरचेच आहेत. फक्त ते भंडार-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आले आहेत. सोबतच विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवरसुद्धा नागपूरलाच स्थायिक झाले आहेत. ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या कोट्यातील रामटेकचे माजी आमदार ऍड. आशीष जयस्वाल राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा म्हणून नागपूरला ओळखले जाते. केंद्रात गडकरी आणि राज्याचे नेतृत्व फडणवीस करीत आहेत. गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर देवेंद्र पडणवीस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यानंतर केंद्रात नितीन गडकरी मंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे थेट मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. कामठीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा व अबकारी खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.