नागपूर: शहरात भुमाफियांचे जाळे अधिकच सक्रिय होत असून शेतजमीन, प्लॉट आणि फ्लॅट विक्रीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी संपूर्ण शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गुन्हे शाखेअंतर्गत नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या भुमाफिया विरोधी विशेष पथकाने गेल्या काही दिवसांत विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाच गंभीर गुन्हे नोंदवले असून या सर्व प्रकरणांतील फसवणूक रक्कम तब्बल रु. 50,51,500/- इतकी आहे.
प्रकरणांचे तपशील खालीलप्रमाणे –
१) कोतवाली – 80 लाखांची प्लॉट फसवणूक
हितेश अग्रवाल या आरोपीनं बनावट महिला उभी करून, खोटे आधारकार्ड आणि बनावट सहीच्या आधारे बेसा येथील दोन प्लॉटची फसवणूक केली.
२) कोतवाली – 3.80 कोटींच्या शेतीविक्रीत फसवणूक
गणेश धांडे याने 19 एकर जमिनीचे बनावट आमुखत्यार तयार करून फिर्यादींच्या नावाने खोटे फोटो व माहिती लावून अतिशय मोठा गैरव्यवहार केला.
३) शांतिनगर – बनावट लेआउटद्वारे 6.40 लाखांची फसवणूक
सुहास लाउने व रचना गजभिये या दोघांनी मालकी नसलेल्या शेतीवर लेआउट काढून लोकांकडून पैशांची उकळी केली.
४) हुडकेश्वर – एकाच भूखंडाची दोन व्यक्तींना विक्री
अविनाश खडके याने एकदा विकलेला भूखंड पुन्हा इतराला विकून 30 लाखांचा फटका दिला.
५) सक्करदरा – घर न देता 8.71 लाखांची फसवणूक
धीरज राजपूत याने घर विक्रीच्या नावाखाली रक्कम घेतली मात्र घर न देता फसवणूक केली.
भुमाफिया पथकाची गतीशील कामगिरी
अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) मा. वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) मा. राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मा. डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र नाईकवाड यांच्या नेतृत्वात विशेष पथक कार्यरत असून तक्रारींवर जलदगतीने कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांना दिलेला महत्त्वाचा संदेश-
पोलीस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले आहे की,जमिनीचे सर्व दस्तऐवज नीट तपासूनच व्यवहार करावेत.खोटे कागदपत्र, फसवणूक किंवा धमकी मिळाल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे.
कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास गुन्हे शाखा (डिटेक्शन), नागपूर शहर येथे लेखी तक्रार नोंदवावी.
भुमाफियांच्या वाढत्या कृत्यांमुळे नागपूर पोलिसांनी घेतलेली ही मोहीम नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.









