नागपूर : नागपूरहून कोलकात्याकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये अचानक गोंधळ उडाला. उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमानाला आकाशात पक्ष्यांची टक्कर बसली. पायलटने तत्काळ ही बाब नियंत्रण कक्षाला कळवली आणि नागपूर विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केली.
इंडिगोची ही फ्लाइट क्रमांक 6E812 होती. विमानात १६० ते १६५ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लँडिंगनंतर विमानाची तपासणी सुरू असून इंजिनियरिंग टीम विमानाच्या स्थितीचा अभ्यास करत आहे.
अलिकडच्या काही काळात देशात विमानाशी संबंधित दुर्घटना व तांत्रिक बिघाडांच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. नुकतेच ९ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती उपखंडातील कटफळ गावाजवळ एक ट्रेनिंग एअरक्राफ्ट कोसळले होते. यात पायलटला किरकोळ दुखापत झाली होती. त्याआधी १९ जून रोजी दिल्ली-लेह इंडिगो फ्लाइट 6E2006 ला तांत्रिक अडचणीमुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती.
याचबरोबर २ जून रोजी रांचीमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. पटना-कोलकाता वाया रांची मार्गावरील फ्लाइटला गिधाड धडकले होते, तेव्हा विमानात १७५ प्रवासी होते. तेव्हाही पायलटने शिताफीने लँडिंग करत सर्वांचा जीव वाचवला होता.
सध्या नागपूर विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांनी हवाई सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.









