नागपूर – नाशिक, औरंगाबाद आणि लखनौनंतर आता नागपूर-कोल्हापूर विमान सेवा देखील अचानक बंद करण्यात आली आहे. मे महिन्यात सुरू झालेली ही सेवा केवळ दोनच महिने चालू राहिली आणि आता *स्टार एअर*ने ही उड्डाण सेवा स्थगित केली आहे.
यामुळे विशेषतः कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे. हवाई प्रवासामुळे मिळणारी सोय आता बंद झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
उड्डाणाचा शेड्यूल काय होता?
फ्लाइट क्रमांक एस5-135 दर आठवड्याला सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी दुपारी २:३५ वाजता नागपूरहून कोल्हापूरसाठी उड्डाण करत असे. सध्याच्या माहितीनुसार ही सेवा ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर ती पुन्हा सुरू होईल की नाही, यावर अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही.
याआधीही थांबलेल्या सेवा-
नागपूरहून नाशिक, औरंगाबाद आणि लखनौसाठी पूर्वी सुरू असलेल्या विमानसेवा देखील ‘समर शेड्यूल’च्या नावाखाली थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, जुलैमध्ये समर सीझन संपल्यानंतरही त्या सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
प्रवाशांमध्ये संताप-
नागपूरहून सतत बंद केल्या जाणाऱ्या विमानसेवांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. एकीकडे नागपूरला लॉजिस्टिक हब बनवण्याचे स्वप्न दाखवले जाते, तर दुसरीकडे महत्त्वाच्या शहरांशी हवाई संपर्क कमजोर होत चालल्याने नागपूरच्या हवाई सुविधा आणि संभाव्य विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यामुळे अनेक प्रवाशांना आता मुंबई किंवा पुण्याच्या मार्गे वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे, जे वेळखाऊ आणि खर्चिक देखील ठरत आहे.