
नागपूर : नागपूर-काटोल मार्गावरील फेटरी हनुमान मंदिराजवळ ७ ऑक्टोबरच्या रात्री भीषण अपघात झाला. नागपूरच्या दिशेने जाणारी अल्टो कार अचानक उलटली. त्यानंतर कारने पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. या अपघातात जखमी झालेल्या पंकज कोसे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी रोडवरील दहाव्या नंबर पुलियाजवळील रहिवासी पंकज कोसे हे या अपघातात जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरला रेफर केले.
दरम्यान, कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



