
नागपूर : शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कपिलनगर पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला अटक करून चोरीची नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. विहंग सचिन पाटील असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत सुमारे ६ लाख ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोरेवाडा येथील प्रतीक पांडुरंग शापामोहन यांनी आपली दुचाकी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकन्या नगर येथील बुद्ध विहाराजवळील पावभाजीच्या दुकानासमोर उभी केली होती. याचदरम्यान अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक तरुण संशयास्पदरीत्या दुचाकीवर फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून वाहनाची कागदपत्रे मागितली; मात्र तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. चौकशीत संबंधित दुचाकी मानकापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी विहंग पाटील याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कपिलनगर परिसरातून एक, लकडगंजमधून एक, मानकापूरमधून तीन आणि अंबाझरी परिसरातून तीन दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी एकूण नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



