
नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील ताब्याबाबत श्री. महेंद्र जिचकर यांनी दाखल केलेले दिवाणी अपील जिल्हा न्यायाधीश-६, नागपूर यांनी खर्चासह फेटाळून लावले आहे. त्यामुळे तात्पुरता मनाई आदेश देण्याची मागणी फेटाळणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम राहिला आहे.
फुटाळा परिसरातील नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर आपला हक्क व ताबा असल्याचा दावा करीत श्री. जिचकर यांनी महानगरपालिकेला संबंधित जागेचा ताबा घेण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयाकडे तात्पुरत्या मनाई आदेशाची मागणी केली होती. मात्र, संबंधित विवादित जमीन ही त्यांच्या मालकीच्या ६०० चौ. मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडापेक्षा वेगळी असून, ती नागपूर महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक जमीन असल्याचे न्यायालयीन नोंदींवरून स्पष्ट झाले. तसेच, विवादित जमिनीवर आपला हक्क असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध करण्यात अपीलकर्ते अपयशी ठरल्याने त्यांना तात्पुरता मनाई आदेश देण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात न्यायालयाने Misc. Civil Appeal No. 137/2026 फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाने ५ मे २०२६ रोजी दिलेला आदेश कायम ठेवला आहे.
या निकालामुळे नागपूर महानगर पालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील अनधिकृत ताब्याविरुद्ध महानगरपालिकेने घेतलेल्या भूमिकेला न्यायालयीन बळ मिळाले आहे. तसेच, महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीचा ताबा पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणात नागपूर महानगरपालिकेतर्फे अॅड. ए. एम. काझी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना विधी अधिकारी श्री. सुरज पारोचे आणि सहाय्यक विधी अधिकारी श्री. आनंद शेंडे यांचे सहकार्य केले.



