Published On : Wed, Oct 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ४० लाखांच्या दागिन्यांच्या लुटीचा छडा; उत्तर प्रदेशातून चार आरोपी अटकेत

३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले; एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे शाखेची कारवाई
Advertisement

नागपुर में ज्वेलर्स दुकान पर 40 लाख की डकैती का पर्दाफाश! यूपी के बरेली, नोएडा और मेरठ से चार आरोपी गिरफ्तार

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणा रोडवरील ढोमणे ज्वेलर्समध्ये सुमारे ४० लाख रुपये किमतीचे दागिने लुटल्याच्या प्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील बरेली, नोएडा आणि मेरठ येथून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढला. गुन्ह्यात वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कारही जप्त करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.

दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानात लूट-

३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४० ते ४.५५ वाजताच्या सुमारास हिंगणा रोडवरील महाकाली बारसमोर असलेल्या ढोमणे ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. दुकानमालक राकेश सुभाष ढोमणे यांचा कर्मचारी शुभम खेमराज हाडगे दुकानात उपस्थित असताना चार आरोपी आत शिरले. त्यांनी बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवून शुभमला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यासोबत मारहाण करून दुकानातील सुमारे ३५० ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले आणि घटनास्थळावरून पळ काढला. लुटलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Advertisement

सात दिवसांच्या तपासानंतर आरोपी जाळ्यात-

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळ आणि परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपींच्या हालचाली, पळून जाण्याचे मार्ग आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले. आरोपी उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथके तेथे रवाना झाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार दिवस गोपनीय पद्धतीने तपास करून आरोपींचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी सर्वप्रथम अभिषेक सिंह ठाकूर याला बरेली येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर जयराम ऊर्फ जोगिंदर अशोक सिंह ठाकूर (१९) आणि शुभांकित निलेशकुमार चतुर्वेदी (२२) यांना नोएडा येथून, तर राजन सामी शर्मा (२९) याला मेरठ येथून अटक करण्यात आली.

फॉर्च्युनर कार जप्त; अन्य आरोपींचा शोध सुरू-

या गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-४९-बी-९१९२ क्रमांकाची फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली आहे. लुटलेले दागिने हस्तगत करण्यासाठी आणि टोळीतील अन्य सदस्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींची गुन्ह्यातील नेमकी भूमिका आणि त्यांच्या अन्य गुन्ह्यांतील सहभागाचाही तपास केला जात आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.

चार आरोपींच्या अटकेमुळे पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असले, तरी लुटलेल्या दागिन्यांची बरामदगी आणि अन्य साथीदारांचा शोध ही पुढील तपासातील महत्त्वाची आव्हाने आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.