नागपूर : शहरातील जयंत तांदुळकर यांनी नखावर ठेवता येणार इतका लहान चरखा तयार केला आहे. या चरख्याची लिम्का बुक ऑफ रेकार्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.तांदुळकर यांची आगळी-वेगळी कला पाहून सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
तांदुळकर यांच्या या ४० मिलिग्राम वजनाच्या चरख्याची यापूर्वी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ व ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही नोंद घेतली आहे. नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथे तांदुळकर वास्तव्यास आहेत.महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल पदावर कार्यरत असून यासोबतच ते आपले छंद जोपासण्यास मागे नाहीत.
तांदुळकर यांनी २०२० मध्ये ३.२० मिमी लांबी, २.६८ मिमी रुंदी आणि ३.०६ मिमी उंचीचा चरखा तयार केला. हा चरखा तयार करण्यासाठी त्यांनी छोट्या काडया, स्टील आणि कापसाच्या सुताचा वापर केला. हा चरखा आकाराने इतका लहान असूनही त्यावर सूत कातले जात आहे. या चरख्याचे वजन केवळ ४० मिलिग्राम आहे, हे विशेष.