नागपूर टुडे : नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू व्यवसायाशी संबंधित ३८ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. इतवारी पोस्ट ऑफिसजवळील कसार भवनसमोर रविवारी सकाळी एका चहाच्या टपरीत मनीष चंद्रशेखर मोहिते (३८, रा. महाल) हा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मनीषसोबत असलेल्या तीन मित्रांना अटक केली. निखिल चव्हाण, कुणाल झाडे आणि विनय पौनीकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार निखिल आणि कुणाल यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मनीषविरुद्धही काही गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे.
पोलिस तपासानुसार, शनिवारी रात्री मनीष हा निखिल, कुणाल आणि विनय यांच्यासोबत होता. रात्री साडेआठच्या सुमारास त्याने भाऊ रोशनला फोन करून वाहनाच्या चावीबाबत विचारणा केली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने पुन्हा फोन करून पैशांची मागणी केली. मनीषने रोशनला झेंडा चौकातील व्हाइट हाऊस बारमध्ये बोलावले. तेथे मनीष आणि निखिल दारू पीत होते. काही वेळाने कुणाल आणि विनयही तेथे आले. चौघांनी एकत्र दारू प्यायल्यानंतर ते दोन ॲक्टिव्हावरून तेथून निघाले.
मनीष आणि निखिल एका ॲक्टिव्हावर, तर कुणाल आणि विनय दुसऱ्या ॲक्टिव्हावर होते. त्यानंतर मनीष रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी संपर्क साधला असता त्याने आपण चितारओळी परिसरातील ताजणेकर मूर्तिकार यांच्या दुकानाजवळ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.
रविवारी सकाळी चहाच्या टपरीजवळ मनीष रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्याच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले दगडही आढळल्याने दगडाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हत्येतील शस्त्र आणि हल्ल्याची नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
क्राइम ब्रांच युनिट-३चे उपनिरीक्षक मधुकर काठोके यांनी मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर मनीषवर जीवघेणा हल्ला झाल्याची आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. मृताचा भाऊ रोशन मोहिते याने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मनीष हा वाळू व्यवसायाशी संबंधित असून तुमसर येथील गोटू मोहिते याच्यासोबत वाळूचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पैशांच्या देवाणघेवाणीचा किंवा आर्थिक वादातून हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. बारमधून बाहेर पडल्यानंतर चौघे कुठे गेले, त्यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि मनीष चहाच्या टपरीपर्यंत कसा पोहोचला, याचा तपास सुरू आहे.
तहसील पोलीस आणि क्राइम ब्रांचकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून अटक केलेल्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. हत्या अचानक झालेल्या वादातून झाली की पूर्वनियोजित कट होता, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.




