Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात इन्स्टाग्रामवरील ओळखीचं रूपांतर हल्ल्यात; मैत्रिणीला त्रास देण्यास विरोध केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Advertisement

नागपूर :नागपूरातील पाचपावली परिसरात इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीमुळे धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला सतत फोन करून त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारणे तिच्या मित्राला महागात पडले. आरोपींनी तरुणाच्या दुचाकीला धडक देत त्याच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केला आणि त्याचा महागडा iPhone हिसकावून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पाचपावली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौक येथे घडली. रमीज अहमद मोबिन अहमद पिंजारे याच्या महिला मैत्रिणीची दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आदित्य कोचे याच्याशी ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर आदित्य हा तरुणीला वारंवार फोन करून भेटण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.

या प्रकाराची माहिती तरुणीने रमीजला दिल्यानंतर त्याने आदित्यला फोन करून राणी दुर्गावती चौकात बोलावले. मात्र, चर्चा करण्याऐवजी आरोपी आधीपासूनच आपल्या साथीदारांसह तेथे दबा धरून बसले होते. त्यांनी रमीजच्या मोपेडला धडक देऊन त्याला खाली पाडले आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी तसेच इतर हत्यारांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीदरम्यान आरोपींनी रमीजचा महागडा iPhone हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

Advertisement

तक्रार दाखल होताच पाचपावली पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आदित्य कोचेसह चार आरोपींना अटक केली. तर या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस ठाण्याचे पीएसआय रंजीत मांजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.