Published On : Thu, Aug 15th, 2019

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभ

नागपूर: रस्ते, पाणी, वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत सुविधांमुळे नागपूरसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्थांमुळे जगातील व देशातील विद्यार्थी येथे आकृष्ट होत आहे. त्यामुळेच एज्युकेशन हब म्हणून नागपूरची सर्वत्र ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी महापौर नंदाताई जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महानगर आयुक्त शितल उगले, वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जगात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहयोगाने जिल्हा विकासाकडे वाटचाल करीत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून जिल्ह्याच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा विकासात्मक कार्यासाठी विनियोग केला जात असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

विविध पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, स्काऊट गाईडमध्ये राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा, जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील यशस्वी ग्राम पंचायती, स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत स्मार्ट ग्राम पंचायती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, महिला बचत गट, पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरीक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तीन मोबाईल सर्व्हेलन्स व्हेईकल व ड्रोनचे उद्घाटन करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण कुटुंबाला वीज आणि स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी पुरविण्यासोबतच ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हयात मोठ्या प्रमाणात याअंतर्गत घराचे बांधकाम सुरु आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत जिल्हयातील पात्र कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिका व गॅस जोडणी देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्हयाने राज्यात उत्कृष्ट कार्य केले आहे. महसूल विभागातर्फे जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा अधिक गतिमान व सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये नागपूर विभाग अव्वलस्थानी आहे. झुडपी जंगलाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी विभागातील झुडपी जंगलाअंतर्गत येणाऱ्या जागेसंदर्भातील अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात आला असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

कृषी, जलसंधारण व सहकार क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सन्मानाने आपला शेती व्यवसाय करता यावा यासाठी सहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्हयात 2160 कामे पूर्ण झाली. शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान त्यांच्या शेतावर देण्याच्या कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्हयात 20 कोटी रुपयाचे ट्रॅकटरसह इतर अवजारे उपलब्ध करुन दिले. मागील एक वर्षात 8 कोटी रुपयाचे 325 ट्रॅकटरसह आवश्यक यंत्र सामुग्री दिली आहे. राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट, हरितगृहासाठी सुमारे 16 कोटी रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे. शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होवून यासाठी पेंच लाभक्षेत्रात सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विभागात असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या पुनर्जिवनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जिल्हयात जलसंवर्धनाची विविध कामे घेण्यात आली. याद्वारे 72 हजार 996 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. 33 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेत जनतेचाही चांगला सहभाग मिळत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

सर्वांसाठी घरे व आरोग्य यासंदर्भातील योजनाबाबत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हयातील पिवळा व केशरी रेशनकार्ड असलेल्या सुमारे 10 लाख 28 हजार 528 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्हयातील 3 लाख 77 हजार कुटुंबांना आरोग्य सेवेचे कवच मिळणार आहे. मुलींचे जन्मदर वाढविणे, भ्रूणहत्या रोखणे यासाठी माजी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी अमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर जिल्हयामध्ये 33 हजार 93 घरांना मंजुरी देण्यात आली आहे. कामठी व महादुला येथे 2 हजार 192 घरकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. घरकुल बांधकाम योजनेअंतर्गत घटक क्रमांक 3 मध्ये 16 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. याअंतर्गत 13 हजार 701 घरकुलांना मंजुरी दिली आहे. वैयक्तीक घरकुलाच्या बांधकामाकरिता या योजनेअंतर्गत 11 कोटी रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

नागपूरच्या शैक्षणिक विकासासंदर्भात व सामाजिक न्यायविभागाच्या योजनासंदर्भात पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असून सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, आयआयएम, आयआयआयटी, एम्स, राष्ट्रीय विधी महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण संस्थांमुळे देश व विदेशातील विद्यार्थी नागपूरकडे आकर्षित होत आहे. जिल्हयातील 817 शाळा डिजिटल करण्यात आल्या असून शाळाबाह्य असलेल्या 151 मुलांना मुख्यप्रवाहात आणण्यात आले आहेत.

अतिदुर्गम व आदिवासी भागात राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाला गती देण्यासाठी विविध योजनाची अमलबजावणी सुरु आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इग्रंजी माध्यम मोफत प्रवेश दिला जात असून याअंतर्गत नागपूर व वर्धा जिल्हयात 2391 विद्यार्थी नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवासाचा खर्च थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. परदेशात शिक्षण घेण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

उद्योग व कौशल्य विकासाच्या विविध योजनांबाबत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूरसह विदर्भाच्या विकासाला चालना देणाऱ्या मिहान प्रकल्पाच्या विकासासोबतच युवकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. या प्रकल्पाअंतर्गत सहा प्रकारच्या उद्योग व कंपन्यांनी गुंतवणूक करुन उद्योग विकसित केले आहे. मिहानमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अग्रणी कंपनी सुरु झाल्या असून यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. औषध निर्मिर्ती, अन्नप्रक्रिया आदी उद्योगांमध्ये 35 हजारपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक (लॉजिस्टीक हब) म्हणून विकसित करण्यात येत आहे. जिल्हयात उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व सोईसुविधा उपलब्ध झाल्यामुळे विशाल प्रकल्प धोरणाअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देऊन या प्रकल्पाद्वारे 35 हजार 271 कोटी रुपयाची प्रत्यक्ष गुंतवणूक व 30 हजार 940 लोकांना थेट रोजगार अपेक्षित असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ऊर्जाक्षेत्रातील विकासाबाबत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, जिल्हयातील विज वितरणाचे जाळे अधिक बळकट करण्यासोबतच विज ग्राहकांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी 1830 कोटी रुपयाची योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये भूमिगत विज वितरण, संपूर्ण सुरक्षित असलेले रोहित्र बसविणे, पायाभूत सुविधांचा विकास, उपकेंद्राची निर्मिती आदिंचा समावेश आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत 203.55 कोटीची कामे प्रगतीपथावर आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत जिल्हयात 301.26 कोटीची विकास कामे प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यात 107.35 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 193.31 कोटी रुपयाचे नियोजन आहे. नागपूर शहराच्या झपाटयाने होणारा विकास लक्षात घेवून अपघात विरहित आणि दर्जेदार विज पुरवठा करणे व बळकटीकरण करणे यासाठी 560.44 कोटीची स्मार्ट सिटी योजना प्रस्तावित आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील 40 लाख कृषिपंपांना सौरऊर्जेने जोडण्याचे काम सुरु असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्राबरोबर पायाभूत सुविधाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सन 2014-15 ते 2019 या काळात डीपीडीसी 776.87 कोटीची झाली आहे. म्हणजेच मागील पाच वर्षात 300 टक्के निधीत वाढ झाली आहे. यासोबत अनुसूचित जाती उपाययोजनामध्ये 76 टक्के, आदिवासी उपाययोजना अंतर्गत यापेक्षा दुप्पट वाढ झाली आहे. खनिज विकास निधीअंतर्गत 131 कोटी 35 लक्ष रुपये जिल्हयातील पायाभूत सुविधासह विविध विकास कामांसाठी उपलब्ध झाले आहे. यापैकी 319 कामांसाठी 107 कोटी 56 लक्ष रुपयेच्या कामांना मान्यता प्राप्त झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गतही विविध विकासकामे आखण्यात आली आहेत. शहरात सीसीटीव्ही, वॉयफॉय, हॉटस्पॉटसह पर्यावरणाची माहिती देणारे सेंसर, पब्लीक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पोलीस विभागांना गुन्हयाचा शोध घेणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे व वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम यशस्वीपणे सुरु असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संग्रहालयाच्या विकासासाठी विकास आराखडा निधी उपलब्ध करुन दिला आहे. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीला अ वर्ग तिर्थक्षेत्रात आणि पर्यटनाचा दर्जा दिला आहे. कोराडी महालक्ष्मी देवस्थानच्या विकासासाठी विशेष तयार करण्यात आलेला आराखडयाची अमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. यासोबत रामटेक, आदासा, ताजबाग आदी धार्मिक व एतिहासिक पर्यटन स्थळांचे ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झाली. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या प्रत्येक कुटुंबाला संपूर्ण मदत तसेच पिण्याच्या पाण्यासोबत जीवनावश्यक साहित्य पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. अपुऱ्या व अनियमित पावसामुळे सिंचनासोबतच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तोतलाडोह व पेंच प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मध्यप्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कन्हानचे पाणी टनेलद्वारे तोतलाडोहपर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी भरीव निधीही उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.