
नागपूर : नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि नंतर लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ओम गायकवाड (वय २०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून तरुणीने त्याच्यावर भरोसा ठेवला. आरोपीने तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. त्यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, घरच्यांची संमती नसल्याचे कारण देत आरोपीने लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने पोलिसांत धाव घेतली. तक्रारीच्या आधारे इमामवाडा पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.



