
नागपूर : नागपूर सेंट्रल जेलमध्ये वकालतनामा दाखल करण्यासाठी गेलेल्या वकिलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात जेल कर्मचारी अमोल येवतकर याच्यावर मारहाणीचा आरोप आहे.
वकील गौरव वंजारी मोबाईलवर घटनेचा व्हिडिओ काढत असताना आरोपीने त्यांचा गळा व केस पकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी हातातील कड्याने कपाळावर वार केल्याने वंजारी जखमी झाले. त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता गौरव वंजारी हे मित्र श्रीकांत निमजे यांच्यासोबत नागपूर सेंट्रल जेलमध्ये वकालतनामा दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी अमोल येवतकर याने कथितरीत्या अश्लील शिवीगाळ केली.
काम आटोपून परतत असताना शंकरनगर चौकाजवळ आरोपीने पुन्हा वाद घातल्याचा आरोप आहे. वंजारी यांनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यास सुरुवात करताच आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी गौरव वंजारी यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अमोल येवतकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



