नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांसह इतर औषधांची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विनोबा भावेनगर येथील श्री साई दवाखान्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला. या प्रकरणात राजेश चरडे आणि सुधाकर उचके या दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
औषध निरीक्षक स्वाती भरडे यांना श्री साई दवाखान्यात आवश्यक परवान्याशिवाय गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे, पुरुषांमधील कामोत्तेजना वाढविणारी औषधे तसेच इतर औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाने दवाखान्यावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा परवान्याशिवाय विक्रीसाठी ठेवलेला औषधसाठा, अल्प्राझोलमच्या गोळ्या आणि गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे आढळून आली. चौकशीत डॉक्टर सचिन मरघडे यांनी काही औषधे राजेश चरडे याच्याकडून मिळाल्याचे सांगितले.
यानंतर औषधांचा पुरवठा करण्यासाठी राजेश चरडे दवाखान्यात आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत राजेशने ही औषधे सुधाकर उचके याच्याकडून मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सुधाकर उचकेलाही अटक केली.
तपासात खरबी येथील मयूर जायसवाल हा औषधांचा पुरवठा करीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याच्या घरीही छापा टाकला; मात्र तेथे कोणताही आक्षेपार्ह औषधसाठा आढळला नाही. मयूर जायसवालही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
या प्रकरणात राजेश चरडे आणि सुधाकर उचके यांना अटक करण्यात आली असून, सचिन मरघडे आणि मयूर जायसवाल यांचा शोध सुरू आहे. यशोधरानगर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रतिबंधित आणि विनापरवाना औषधांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच या औषधांच्या पुरवठ्याचे संपूर्ण जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.




