Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘हिरा स्वीट’वर एफडीएची मोठी कारवाई; उत्पादन युनिटमध्ये मृत उंदीर आढळल्याने परवाना रद्द!

Advertisement

नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नागपुरातील पाचपावली परिसरातील ‘हिरा स्वीट’ या प्रतिष्ठानावर मोठी कारवाई करत त्याचा अन्न व्यवसाय परवाना रद्द केला आहे. उत्पादन युनिटमध्ये मृत उंदीर आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली असून, शहरातील खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाने हिरा स्वीटच्या उत्पादन केंद्राची तपासणी केली असता उत्पादन विभागात मृत उंदीर आढळून आला. ही बाब सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

यानंतर ६ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत हिरा स्वीटचा अन्न व्यवसाय परवाना रद्द करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई संयुक्त आयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. ए. एन. खंडारे यांनी केली.

Advertisement

एफडीएच्या या कठोर कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांच्या उत्पादनात स्वच्छता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.