Published On : Wed, May 12th, 2021

आरोग्य यंत्रणा बळकटीकरणात नागपूरने मुंबई, पुण्यालाही टाकले मागे

Advertisement

सर्वप्रकारच्या बेडसंख्येमध्ये राज्यात अव्वल : मुंबई, पुणे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर


नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार आला. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी कडक निर्बंध निवडण्यात आला. या काळात नागपुरात मनपा पदाधिकारी आणि मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाने आरोग्य सेवेचे नियोजन करतानाच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर देण्यात आला. परिणामी आरोग्य यंत्रणा बळकटीकरणात नागपूरने मुंबई,पुण्यालाही मागे टाकले आहे. दहा लाख लोकसंख्येमागे असणारी सर्वप्रकारच्या बेड्‌सची संख्या इतर शहरांपेक्षा सर्वाधिक असून यामध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाखांच्या घरात आहे. नागपूर शहराची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात असून नागपूर जिल्हाच नव्हे तर नजिकच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरील शहरांतील नागरिकही नागपूर शहरातील आरोग्य सेवांचा लाभ घेत आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा बहुतांश नागपूर शहरात उपलब्ध आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर मार्च महिन्याच्या उत्तरार्धात दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येत वाढ झाली. आरोग्य यंत्रणेवरचा ताण या काळात प्रचंड वाढला. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी मनपा आणि जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातली. यानंतर दुसऱ्या आठवड्यात राज्यसरकारने कडक निर्बंध जाहीर केले. या काळात शहरातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे प्रयत्न मनपा पदाधिकारी आणि प्रशासनाने सुरू केले.

महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची व्यवस्था करण्यासोबतच बेड्‌सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या पुढाकारातून व्हेंटिलेटरसह अन्य आरोग्य उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. परिणामी सध्या नागपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलने प्रति दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या बेड्‌सची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड्‌स १६६३२ आहेत.

ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या बेड्‌सची संख्या ९९४४ तर आय.सी.यू. बेड्‌सची संख्या २८०८ आहे. आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्‌सची संख्या ९९६ आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या ४.६ दशलक्ष आहे. त्यामुळे सध्या नागपूर जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ३६१६ बेड्‌स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ऑक्सिजन बेड्‌स २१६२, आय.सी.यू. बेड्‌स ६१०, तर आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्‌स २१७ आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी दिली. त्यांनी सांगितले की वर्ष २०२० मध्ये पहिल्या लाटेच्यावेळी मनपा सोबत फक्त ६६ खाजगी रुग्णालय होते. ही संख्या मार्च अखेरपर्यंत ८८ होती त्यांच्या नेतृत्वात यामध्ये वाढ करुन याला एप्रिलमध्ये १०८ पर्यंत नेली आणि एप्रिलअखेर पर्यंत १४६ रुग्णालय आहेत.

 

महाराष्ट्रात प्रति दशलक्ष लोकसंख्येमध्ये सर्वाधिक बेड्‌स असलेले पहिले पाच जिल्हे/शहर

अनु.क्र. जिल्ह्याचे नाव लोकसंख्या (दशलक्षमध्ये) ऑक्सिजन बेड्‌स

(दहा लाख लोकसंख्येमागे)

आय.सी.यू. बेड्‌स

(दहा लाख लोकसंख्येमागे)

व्हेंटिलेटर बेड्‌स

(दहा लाख लोकसंख्येमागे)

१. नागपूर ४.६ २१६२ ६१० २१७
२. मुंबई ३.१ १३२५ ३३२ १८६
३. पुणे ९.४ ११९२ ४०६ १५८
४. सांगली २.८ ११८५ ३४५ १२४
५. मुंबई उपनगर ९.६ १०२२ २१४ १०९