
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात देहव्यवसायाच्या कथित नेटवर्कचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि AHTU पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून साडेतीन ग्रॅम MD पावडर, रोकड, ॲक्टिव्हा आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंथन गोपाल थोटे (२३, रा. चंद्रमणीनगर, अजनी) असे आहे. आरोपी महिलांना कमी वेळेत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच तो ग्राहकांची व्यवस्था करत असल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभाग आणि AHTU पथकाने दोन पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने हनुमान नगर सार्वजनिक ग्रंथालयासमोर कारवाई केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने बोगस ग्राहकासाठी एका महिलेला उपलब्ध करून दिल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता साडेतीन ग्रॅम MD, रोकड, ॲक्टिव्हा आणि दोन मोबाईल फोन आढळून आले.
या प्रकरणात कुणाल यशवंत येलेकर याला वांछित आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. अजनी पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




