Published On : Fri, Mar 20th, 2020

नागपूर ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त भागास ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांची भेट

महावितरणकडून शर्थीच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळित

नागपूर : नागपूर ग्रामीण भागात काल झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गौरी आणि कोटगाव या दोन गावांना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री ना.नितीन राऊत यांनी आज भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी दुग्धविकास, पशुसंवर्धन,क्रिडा व युवाकल्याण ना.सुनील केदार, आमदार टेकचंद सावरकर हेही त्यांच्या सोबत होते.

या वेळी मंत्री महोदयांनी नागरिकांना सर्वोपरी मदत देण्याच्या सूचना दिल्या.या दोन गावांपैकी कोटगावचा वीज पुरवठा सकाळी सुरु करण्यात आला असून गोवारी गावाचा वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

गुरुवार दि. १९.०३.२०२० ला दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास मौदा तालुका येथे गोवारी कोटगाव येथे चक्रीवादळासह पाऊस झाल्यामुळे महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे ४६ पोल व लघुदाब वाहिनीचे ९५ पोल तुटले, त्यामुळे गोवरी व कोटगाव या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या गावांना आज मंत्री महोदयांनी भेट दिली.या वेळी स्थनिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, नागपूर परिमंडलाचे ग्रामीण परिमंडलाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,कार्यकारी अभियंता अमित परांजपे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


दि.२०.०३.२०२० ला सकाळपासून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याकरिता ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री ना.नितीन राऊत यांच्या निर्देशनानुसार मनुष्यबळ व साधनसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली.

या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाना नंतर कोटगाव येथील विद्युत पूरवठा चालू करण्यात महावितरणला सकाळी यश आले असून गोवरी गावातील घरगुती ग्राहकांचा वीज पूरवठा लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टीने महावितरण सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. वादळामुळे महावितरणचे उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनीचे सुमारे 141 पोल क्षतिग्रस्त झाले आहे.