
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये बंडाची शक्यता निर्माण झाली आहे. माजी आमदार अनिल सोले हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपकडून सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. अखेर पक्षाने कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर सोले यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोले सोमवारी दुपारी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
मागील पदवीधर निवडणुकीतही भाजपने ऐनवेळी अनिल सोले यांना डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी नागपूरचे महापौरपदही भूषवले आहे. त्यामुळे सोले यांच्या पुढील भूमिकेकडे भाजपसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



