नागपूर : नागपूरच्या हिंगणा रोडवरील आयसी स्क्वेअरजवळ असलेल्या शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या धक्कादायक छळ आणि चोरी प्रकरणानंतर प्रशासनाने कडक कारवाई करत वसतिगृहाच्या वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकाला तात्काळ बडतर्फ केलं आहे. विभागीय चौकशीत दोघांचीही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
ही माहिती सामाजिक मागासवर्गीय कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त विजय वाकुळकर यांनी अधिकृत पत्रकाद्वारे दिली. वॉर्डन आणि गार्ड दोघेही कंत्राटी पद्धतीने नियुक्त होते. त्यांच्या सेवेतून तत्काळ काढून टाकण्यात आलं आहे. यासोबतच राज्यभरातील सर्व शासकीय वसतिगृहांची सुरक्षा व्यवस्था पुन्हा तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ही घटना २३ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन अज्ञात व्यक्तींनी नव्याने सुरू झालेल्या वसतिगृहात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी एका अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने आरडा-ओरडा केल्यानंतर आरोपींनी तिचा मोबाईल हिसकावला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
सकाळी ८ वाजता ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत लैंगिक छळ आणि चोरीचे कलम लावून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात वसतिगृहात सुरक्षा यंत्रणेचा गंभीर अभाव असल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रभर कार्यरत गार्ड, तसेच तातडीच्या प्रसंगी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नव्हती. आणखी धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी ज्या आपत्कालीन जिन्याद्वारे प्रवेश केला, त्याचा कुलूप तीन दिवसांपासून तुटलेले होते आणि त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती.
या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शासकीय वसतिगृहामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी प्राथमिक उपाययोजना न करणाऱ्या प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. तसेच कंत्राटी पद्धतीतील अनियमितता आणि देखरेखीत झालेल्या त्रुटींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू ठेवून आहेत. तर सामाजिक न्याय विभागाने राज्यभरातील सर्व वसतिगृहांमध्ये सुरक्षा सुधारणांसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.