Advertisement
संतप्त नागरिकांचा ४ तास रास्ता रोको,

नागपूर : शहरातील गोधनी रोडवर भरधाव टिप्परने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे चिमुकले मूल जखमी झाले. ज्योती पंकज फलके असे मृत महिलेचे नाव आहे. धडकेनंतर दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. याचवेळी टिप्परचे चाक ज्योती यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे गोधनी रोडवरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी रोडवर गारवा बिर्याणी सेंटरसमोर हा अपघात घडला. ज्योती फलके या पती आणि मुलासह दुचाकीने जात असताना मागून आलेल्या भरधाव टिप्परने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. गोधनी रोडवरील खड्डे, वारंवार होणारे खोदकाम आणि रस्त्यालगतचे अतिक्रमण यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अतिक्रमण हटवावे आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
विशेष म्हणजे, अवघ्या २० दिवसांपूर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू, डीसीपी रमेश धुमाळ, वाहतूक पोलीस उपायुक्त आदित्य मिर्खेलकर आणि मानकापूर झोनच्या डीसीपी अन्नपूर्णा सिंह यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री सुमारे ८ वाजता महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्याय यांनीही घटनास्थळी भेट देत परिसरातील अतिक्रमण रातोरात हटविण्याचे निर्देश दिले.
पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करून उपाययोजनांचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या टिप्पर चालकाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत.
एकाच रस्त्यावर २० दिवसांत दोन बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार कधी? आणखी किती निष्पापांचे जीव गेल्यानंतर गोधनी रोडवरील मृत्यूचा सापळा दूर होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges


