Published On : Wed, Mar 6th, 2019

नागपूरचा होतोय सर्वसमावेशक विकास : मुख्यमंत्री

गीतांजली चौक ते गांधीसागर डी.पी. रस्त्याचे भूमिपूजन

नागपूर: समाजातील शेवटच्या माणसाला सोबत घेऊन विकासाचे कार्य होईल, हे लक्षात ठेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर शहराच्या विकासाचा संकल्प आम्ही केला. प्रत्येक माणसाला सोबत घेतल्याने खऱ्या अर्थाने नागपूरचा सर्वसमावेशक विकास होतोय. २१ व्या शतकात नागपूर शहर हे जगातील आधुनिक शहर असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून गीतांजली चौक ते गांधीसागर या डी.पी. रस्त्याचे भूमिपूजन बुधवारी (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यानिमित्त गांधीसागरजवळील रजवाडा पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार मोहन मते, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोनच्या सभापती वंदना यंगटवार उपस्थित होत्या.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात क्रांती झाली आहे. नागपूरचा विकास बघून आम्ही आश्चर्यचकित झालो, असे जेव्हा बाहेरून येणारे लोकं म्हणतात तेव्हा मला व्यक्तीश: आनंद होतो. गांधीसागरचे गतवैभव परत आणण्यासाठी जो प्रस्ताव राज्य शासनाकडे आला, त्यालाही शासनाने मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यातील कामांसाठीचा निधी मंजूर केला. गांधीसागरसाठी आणखी निधी लागला तर तो कमी पडू देणार नाही. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मागणी केलेल्या ई-लायब्ररीला आताच मंजुरी देतो. आचारसंहिता लागण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेने प्रस्ताव पाठविला तर तो तातडीने मंजूर करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. सर्व लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे जनतेसाठी कार्य करीत आहेत. जात, धर्म, पंथ न बघता शासन सर्वांना सोबत घेऊन विकास करीत आहे, असेही ते म्हणाले.

तीन महिन्यात ‘रेडिमेड गारमेंट झोन’ : नितीन गडकरी
१० हजार महिलांना शिवणकामाच्या माध्यमातून रोजगार मिळेल या हेतूने काही वर्षांपूर्वी गीता मंदिरजवळील जागेवर रेडिमेड गारमेंट झोन बनविण्यास आपण मंजुरी दिली होती. मात्र तेव्हा सरकार बदलले आणि प्रस्ताव धूळ खात पडला. आता नव्याने एम्प्रेस मॉल समोरील जागेवर पुढील तीन महिन्यात रेडिमेड गारमेंट झोन तयार होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. निविदा प्रक्रिया सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील गारमेंट झोन म्हणून ते ओळखले जाईल. माजी महापौर प्रवीण दटके यांच्या पुढाकारानंतर राज्य शासनाने गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी २१ कोटी मंजूर केले. आता निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा जाहीरनामा बनविण्याची वेळ आहे तेव्हा जाहीरनामा समिती आपल्याकडे आली. आपल्याकडे सर्वच कामे झाली आहेत. आता जाहीरनाम्यात काय टाकायचे, असा प्रश्न त्यांनी केल्याचे ना. गडकरी यांनी सांगत सर्वच क्षेत्रात विकास झाल्याचे सूचक विधान केले. एकट्या नागपूर लोकसभा क्षेत्रात ७० हजार कोटींची विकास कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी प्रभाग १९ मधील विकासकार्याची माहिती प्रास्ताविकातून दिली. गीतांजली चौक ते गांधीसागर तलाव या रस्त्यासोबतच रेल्वे स्थानकाच्या पूर्व द्वारापासून रजवाडा पॅलेसपर्यंत एम्प्रेस मॉलला समांतर रस्त्याचे कार्यही सुरू होत असल्याचे सांगितले. रस्ता रुंदीकरणाच्या या प्रकल्पात बाधीतांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १३ बाधीतांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येत असून सदर कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात चार बाधीतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिमांड नोट देण्यात आली. डिमांड प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत ३६ हजार रुपये अदा केल्यानंतर आठव्या दिवशी घराची चावीचे हस्तांतरण केले जाईल, असेही दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

तत्पूर्वी रजवाडा पॅलेससमोर कुदळ मारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. प्रभाग १९ च्या वतीने सर्व नेत्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.