नागपूर: शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत क्राइम ब्रँच युनिट-२ने मोठी कारवाई केली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तकिया परिसरात छापा टाकून पोलिसांनी २ किलोहून अधिक गांजा जप्त केला असून, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
क्राइम ब्रँचच्या पथकाने बिरसा मुंडा हॉलजवळील आरोपीच्या घरावर ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांना २ किलो ६९ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ४१ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आसिफ आरिफ खान याला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार शैलेश विजय सोनटक्के याचा शोध सुरू आहे. आरोपींविरोधात धंतोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेत असलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी धंतोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गांजा तस्करीच्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





