
नागपूर -गणेशपेठ हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत आजीला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. मृताच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
मृत तरुणाची ओळख कोतवाली परिसरातील शिवाजी पुतळा येथील अक्षय प्रकाश शेट्टे अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचा मोठा भाऊ मयूर शेट्टे दारूच्या नशेत घरी येऊन आजीला मारहाण करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अक्षय आपल्या मित्रांसह मयूरला समजावण्यासाठी त्याचा शोध घेत होता.
यावेळी मयूर न सापडल्याने त्याच्या तीन मित्रांसोबत अक्षय आणि त्याच्या साथीदारांची बाचाबाची झाली. त्यानंतर अक्षय, आकाश पटले आणि अंकित चव्हाण हे अशोक चौकातून शिवाजी पुतळ्याकडे जात असताना मोरघडे होमिओपॅथी क्लिनिकसमोर त्यांच्या दुचाकीला मागून मोपेडने धडक देण्यात आली.
धडक दिल्यानंतर रितेश उर्फ सोनू डेंगे, अमोल उर्फ भुऱ्या खुरसोड आणि अर्पित बुधे यांनी तिघांवर हल्ला केला. आकाश आणि अंकित यांना मारहाण करण्यात आली, तर अक्षयवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
गंभीर जखमी अक्षयला त्याच्या मित्रांसह मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अक्षयचा भाऊ मयूर शेट्टे याला अटक केली आहे. तर रितेश डेंगे, अमोल खुरसोड आणि अर्पित बुधे या तिघांचा शोध सुरू आहे.



