Published On : Fri, Sep 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ब्लाइंड केसचा पोलिसांनी लावला छडा; नगरसेवकावरील गोळीबारात सात जण जेरबंद

आरोपींची ओळख नव्हती, तरी सीसीटीव्ही, सायबर व फॉरेन्सिक तपासातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचले; गुन्हे शाखेच्या पथकाला २५ हजारांचे बक्षीस
Advertisement
ब्लाइंड केसचा पोलिसांनी लावला छडा; नगरसेवकावरील गोळीबारात सात जण जेरबंद

oplus_144703488

नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांसमोर सुरुवातीला एक ब्लाइंड केस होता. गोळीबार करणारे कोण, ते कुठून आले, त्यांचा नेमका उद्देश काय आणि गोळीबारामागे कोणाचा हात आहे, याबाबत पोलिसांकडे सुरुवातीला ठोस माहिती नव्हती. मात्र, नागपूर पोलिसांनी पारंपरिक तपासासोबतच गुन्हे शाखा, सायबर सेल, फॉरेन्सिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत या अंधारातील गुन्ह्याचा छडा लावला.

तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणे, आरोपींच्या हालचालींचा माग काढणे, मोबाइल व तांत्रिक माहितीचे विश्लेषण तसेच आर्थिक व्यवहार आणि डिजिटल संभाषणांची पडताळणी करत पोलिसांनी सात संशयित आरोपींना गुजरात आणि छत्तीसगडमधून ताब्यात घेतले. या तपासातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून संबंधित गुन्हे शाखेच्या तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

आरोपींची माहिती नव्हती; तपास शून्यापासून सुरू
२६ ऑगस्टच्या मध्यरात्री वाठोडा ले-आउट परिसरातील श्रावणनगर येथील नगरसेवकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीचा आवाज झाल्यानंतर घरातील व्यक्तींना घटना लक्षात आली. गॅलरीतील काचेचे नुकसान झाले. घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये मोपेडवरून दोन व्यक्ती जाताना दिसून आल्या. मागे बसलेल्या व्यक्तीने घराच्या दिशेने गोळीबार केल्याचे फुटेजमध्ये आढळले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख सुरुवातीला स्पष्ट नव्हती. त्यामुळे पोलिसांसाठी हे प्रकरण आव्हानात्मक ठरले. घटनास्थळापासून आरोपींच्या संभाव्य मार्गाचा तपास करताना अनेक कॅमेऱ्यांचे फुटेज एकत्र करून आरोपींच्या हालचालींची साखळी तयार करण्यात आली.

सीसीटीव्हीच्या साखळीने आरोपींपर्यंत पोहोचले
पोलिसांनी शहरातील आणि संबंधित मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयितांच्या हालचाली, संपर्क आणि संभाव्य ठिकाणांची माहिती मिळविण्यात आली.

Advertisement

या तपासात एआय तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात आला. विविध फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून संशयित व्यक्ती आणि वाहनांच्या हालचाली जोडण्यात आल्या. याच तपासातून पोलिस आरोपींच्या जवळ पोहोचले.

अंकुशने झाडली गोळी; ऋषभ चालवत होता अ‍ॅक्टिव्हा
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अंकुश तुमसकर याने गोळीबार केला, तर गुन्ह्यात वापरण्यात आलेली अ‍ॅक्टिव्हा ऋषभ नागदेवे चालवत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

अंकुश तुमसकर याच्यावर यापूर्वी ४६ गुन्हे, तर ऋषभ नागदेवे याच्यावर १४ गुन्हे दाखल असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

५० हजारांचा आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणात आर्थिक व्यवहाराचाही महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. अमित ठाकरे यांच्या खात्यातून ५० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. हा व्यवहार कोणाच्या सांगण्यावरून झाला, त्याचा गोळीबाराच्या कटाशी संबंध आहे का आणि या पैशांचा वापर कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

व्हॉट्सॲप चॅट, मोबाइल आणि डिजिटल पुरावे तपासले
पोलिसांच्या तपासात काही व्हॉट्सॲप चॅट आणि डिजिटल संभाषणही समोर आले आहेत. आरोपी एकमेकांच्या संपर्कात कसे होते, गोळीबारापूर्वी आणि त्यानंतर कोणाशी संपर्क साधण्यात आला, याचा तपास सायबर पथकाकडून करण्यात येत आहे.

मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्स, डिजिटल व्यवहार आणि इतर तांत्रिक पुरावे एकत्रित करून आरोपींच्या भूमिकेची पडताळणी करण्यात येत आहे.

ड्रग्जच्या माहितीवरून नगरसेवकाला लक्ष्य केल्याचा संशय
गोळीबारामागील नेमका उद्देश अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात नगरसेवक पोलिसांना ड्रग्जच्या व्यवहारासंदर्भात माहिती देत असल्याचा आरोपींना संशय होता, असा एक महत्त्वाचा तपासाचा अँगल समोर आला आहे.

या संशयातून नगरसेवकाला लक्ष्य करण्यात आले का, याची पोलिस चौकशी करीत आहेत. मात्र, मुख्य सूत्रधार सापडल्यानंतरच गोळीबारामागील खरा उद्देश आणि संपूर्ण कटाचे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ट्रक अँगलचीही चौकशी
या प्रकरणात पोलिसांकडून ट्रकच्या अँगलचाही स्वतंत्रपणे तपास करण्यात येत आहे. घटनेपूर्वी आणि घटनेनंतर संशयित वाहनांच्या हालचाली, आरोपींचे संपर्क आणि त्यांना मिळालेली संभाव्य मदत याची माहिती गोळा केली जात आहे.

मुख्य सूत्रधार फरार; महिलेचाही शोध
या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. तपासात एका महिलेचा सहभाग असल्याचा संशय असून तीही फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपी आणि संबंधित संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर गोळीबारामागील कटाचा पूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे.

मकोकाच्या कारवाईची तयारी
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेता संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक; २५ हजारांचे बक्षीस
ब्लाइंड केसचा तपास करताना आरोपींची कोणतीही ठोस ओळख नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही, तांत्रिक तपास, सायबर विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. गुजरात आणि छत्तीसगडपर्यंत तपासाची सूत्रे नेऊन सात आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीचे कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय तपासाची दखल घेत माननीय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून संबंधित गुन्हे शाखेच्या तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ब्लाइंड केसचा छडा लावण्यात या पथकाने बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

दरम्यान, फरार मुख्य आरोपीचा शोध सुरू असून त्याच्या अटकेनंतर गोळीबाराचा आदेश कोणी दिला, आर्थिक व्यवहारामागे कोण होते, नगरसेवकाला नेमके का लक्ष्य करण्यात आले आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे.

नागपूर टुडे – रविकांत कांबळे

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.