Published On : Sat, Nov 4th, 2017

पूर्ती सुपर बाजार: बेसा हरवले धुराच्या कवेत

नागपूर: बेसा परिसरातील पूर्ती सुपर बाजारला गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत पूर्ती सुपर बाजारचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पूर्तीचे शहरातील अनेक ठिकाणी सुपर बाजार आहेत. यातील एक सुपर बाजार बेसा परिसरातसुद्धा आहे. ही आठमजली इमारत मनीषनगर-बेसा या रस्त्यावर आहे. पूर्ती सुपर बाजार हा खालच्या मजल्यावर आहे. रात्री अचानक या मजल्याला आग लागली. धूर निघत असल्याचे सुरक्षारक्षक व अन्य काही नागरिकांना दिसले. त्यांनी रात्री ११.४० वाजता अग्निशमन विभागाला फोन करून ही माहिती दिली. नरेंद्रनगर येथे अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. घटनेची माहिती मिळताच येथून अधिकारी आणि ताफा रवाना झाला. ही आग इतकी मोठी होती की ती विझविण्याकरिता अग्निशमन दलाच्या तब्बल चार गाड्यांचा उपयोग करावा लागला.

Advertisement

हलकल्लोळ, पळापळ
खालच्या मजल्यावरील पूर्ती सुपर बाजारला आग लागल्याचे कळताच इमारतीतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ही आग आपल्या मजल्यापर्यंत पोहोचते की काय, अशी साहजिक भीती त्यांच्यात पसरली. त्यामुळे हलकल्लोळ माजला. रहिवाशांची धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलाचे अधिकारी धर्मराज नाकोड घटनास्थळी पोहोचताच त्यांनी सर्वप्रथम या इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढले.

Advertisement

-तर झाला असता स्फोट
पार्किंगमध्ये काही गाड्या लागलेल्या होत्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचताच सर्वप्रथम पार्किंगमधील या गाड्या बाहेर काढल्या. थोडा वेळ झाला असता तरी आगीच्या ज्वाळा या गाड्यांपर्यंत पोहोचून स्फोट होऊ शकला असता. गाड्या बाहेर काढल्यानंतर आगीवर पाण्याचा मारा सुरू झाला. अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे स्फोट टळला.

कारण अद्याप कळलेले नाही
आगीमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. तरीसुद्धा, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुपर बाजारमधील बरेचसे सामान जळून राख झाले आहे. पूर्तीच्या अधिकाऱ्यांच्या मते, दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सामान या आगीत भस्म झाले आहे. अग्निशमन दलातर्फे या आगीमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धूरच धूर
सुपर बाजाराच्या आत किराण्यासह अन्य जळाऊ वस्तू आहेत. त्यामुळे आग लवकर पेटली. आतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. थोडाच वेळात संपूर्ण धूर बेसा परिसरात पसरला. एवढा की, काही वेळ समोरचे काही दिसेनासे झाले. मात्र, अग्निशमन विभागाच्या सतर्कतेने वेळीच संभाव्य दुर्घटना टळल्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement