Published On : Wed, Nov 1st, 2017

नाल्यात २० फुटांपर्यंत आगीच्या ज्वाळा

Fire, Nallah, Nagpurनागपूर – संत्रा मार्केटजवळील गुजराती हायस्कूल व रेल्वे कॉलनीला लागून असलेल्या नाल्यात अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. नाल्यात २० फुटापर्यंत आगीच्या ज्वाळांनी रेल्वे कॉलनीतील नागरिकांनी वाळायला टाकलेल्या कपड्यांनाही कवेत घेतले. त्यामुळे नागरिकांनी भीतीमुळे घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. नाल्यातील पाण्यातून पेट्रोलचा गंध येत असून त्याचा स्रोत शोधण्यात मात्र अग्निशमन विभाग, रेल्वेलाही अपयश आले. त्यामुळे नागरिकांत अद्याप दहशत कायम आहे.

संत्रा मार्केटला लागून रेल्वे वसाहत असून नाल्याच्या पलीकडे गुजराती हायस्कूल आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास नागरिकांना नाल्यात २० फुटांपर्यंत आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. त्यामुळे नागरिकांकडून माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतल्याचे माजी सत्तापक्षनेते व प्रभागातील नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नाल्यातील पाण्यात आग लागल्याने सारेच आश्‍चर्याने घटनास्थळाकडे धावले. या घटनेने दहशत निर्माण झाली असून रेल्वे कॉलनीतील एकाने अग्निशमन विभागाला तत्काळ कळविले. अग्निशमन विभागाने पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या माऱ्याने आग आटोक्‍यात येत नसल्याने फोमचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, रेल्वे स्टेशन परिसरात नाला अगदी अरुंद असल्याने आग विझविताना अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. पाण्यात आग लागलीच कशी? या प्रश्‍नाने साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकले.

दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही येथे बोलावण्यात आले. अग्निशमन विभाग, रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिस आगीच्या कारणाचा शोध घेत रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहापर्यंत पोहोचले. दरम्यान, याबाबत मनपा आयुक्तांनाही कळविण्यात आले. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके व आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवारही घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी आगीच्या कारणाचा शोध घेतला. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मचीही पाहणी केली असता तेथे पेट्रोल किंवा डिझलचा गंध आढळून आला नाही. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक सहाजवळील नाल्यात पेट्रोलचा गंध आला. या नाल्याचे पाणी पुढे संत्रामार्केट जवळील वसाहतीला लागून असलेल्या नाल्यात वाहून जाते. याच नाल्यात आग लागली. आग विझविण्यात विलंब केला असता प्लॅटफॉर्म क्रमांक सहाही आगीच्या कवेत आला असता, असे तिवारी यांनी सांगितले.

महापालिका रेल्वेला जिल्हाधिकारीद्वारे देणार नोटीस
रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील ज्वलनशील पदार्थामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महापालिका रेल्वेला जिल्हाधिकाऱ्यामार्फत नोटीस पाठविणार आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याबाबत सावध राहण्याबाबत नोटीसमध्ये नमूद आहे.

पेट्रोलच्या स्त्रोताबाबत रहस्य कायम
नाल्यात पेट्रोलचा गंध येत असल्याने आगीचे कारण पुढे आले. मात्र, रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस, महापालिका अधिकारी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी नाल्यात पेट्रोल कुठून आले? याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरील दिवसभरानंतरही यावरील रहस्य कायम आहे.

अनेकांनी घरातील सिलिंडर बाहेर काढले
नाल्यातून २० फुटांपर्यंतच्या ज्वाळांमुळे अनेकांचे वाळायला टाकलेले कपडे जळाले. एवढेच नव्हे बाजूलाच असलेल्या पेरूच्या उंच झाडालाही झळा बसल्या. परिणामी आग रौद्र रूप धारण करण्याच्या भीतीने रेल्वे कॉलनीतील अनेकांनी घरातील गॅस सिलिंडर काढून बाहेर फेकले.