नागपूर : नागपूर शहरातील वाठोडा परिसरातील एक्झोटिका स्पा येथे सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत स्पाच्या मालकासह दोन जणांना अटक करण्यात आली असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर स्पाचे व्यवस्थापन पाहणारी एक महिला आरोपी फरार असून तिचा शोध सुरू आहे.
गुन्हे शाखेने ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४१ ते रात्री १०.४० या वेळेत जय जलाराम नगर, वाठोडा ले-आऊट येथील एक्झोटिका स्पावर छापा टाकला. तपासादरम्यान स्पामध्ये अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणात स्पाच्या मालक सरिका चंद्रकांत शिरराव (४८) आणि व्यवस्थापक चंद्रकांत दिवाकर शिरगाव (५९) यांना अटक करण्यात आली आहे. तर स्पाची केअरटेकर कामिनी कुमारी (२५) ही फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत. ती मूळची बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील असून सध्या नागपूरच्या पारडी परिसरात राहत असल्याची माहिती आहे.
पोलीस तपासानुसार, आर्थिक आमिष दाखवून महिलांना स्पामध्ये आणले जात होते. त्यांना जागा आणि ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात कथित देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹५,१८० रोख रक्कम, मोबाईल फोन, फोनपे क्यूआर स्कॅनर, दोन फोनपे पेमेंट बॉक्स, अॅक्सिस बँकेचे स्वाइप मशीन, एक बंद पाकीटातील कंडोम तसेच इतर साहित्य असा एकूण ₹६७,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.





