Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 60 वर्षीय महिलेला 648 ग्रॅम गांजासह अटक

Advertisement

नागपूर : “ऑपरेशन थंडर – ड्रगमुक्त समाज घडवू या” या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कोतवाली परिसरातून एका 60 वर्षीय महिलेला 648 ग्रॅम गांजासह अटक केली आहे. या कारवाईनंतर शहरातील अवैध ड्रग नेटवर्कवर पुन्हा एकदा कडक संदेश गेला आहे.

पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत शहरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे 2026 रोजी दुपारी कोतवाली पोलिसांचे पथक महाल परिसरातील उदाजी नगर, सर्कल क्रमांक 6 येथे गस्त घालत असताना एका महिलेच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. घटनास्थळी काही प्लास्टिक पिशव्या संशयास्पदरीत्या ठेवलेल्या होत्या.
पोलिस जवळ येताच संबंधित महिला पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, मात्र तिला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिचे नाव चांदबानो मोहम्मद हातम (वय 60), रा. उदाजी नगर, महाल असे निष्पन्न झाले.

तिच्या ताब्यातील पिशव्यांची तपासणी केली असता 648 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच 580 रुपये रोख रक्कमही मिळाली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 12,580 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

पोलिसांच्या मते, संबंधित महिला आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्री करत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त अनीता मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋतेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात PSI विकास गोरे, खुशाल राठोड, API शिंदे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.