नागपूर: नागपूरच्या सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मिहिका सूर्यवंशी यांनी ‘मिस अँड मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन’ स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत रजत गटात द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नागपूरसह वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुण्यातील हॉटेल हयात येथे दिवा पेजंट्सचे संस्थापक अंजना आणि कार्ल मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून तसेच ट्रुपिकच्या सहकार्याने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेत्री अंजना सुखानी यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने केले. या मंडळात कार्ल मस्कारेन्हास, डॉ. लीना गुप्ता, राधिका भट्टाचार्य शाह, विद्या तिवारी, डॉ. विक्रमादित्य साळवी, वरुण त्रिपाठी आणि निवेदिता बसू यांचा समावेश होता.
डॉ. मिहिका सूर्यवंशी या सध्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), नागपूर येथे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्या ज्येष्ठ सनदी अधिकारी मनोज सूर्यवंशी आणि मीना सूर्यवंशी यांच्या कन्या आहेत.
त्यांनी माऊंट कार्मेल शाळा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय तसेच सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केली. त्यानंतर राधाबाई मेघे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्वचारोग विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसोबतच त्यांना चित्रकला आणि विविध क्रीडा प्रकारांचीही विशेष आवड आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे डॉ. मिहिका सूर्यवंशी यांनी नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.






