Published On : Tue, Sep 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा अधिकृत दर्जा; ऐतिहासिक, धार्मिक आणि वन्यजीव पर्यटनाला मिळणार नवी दिशा

Advertisement

नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा अधिकृत दर्जा; ऐतिहासिक, धार्मिक आणि वन्यजीव पर्यटनाला मिळणार नवी दिशानागपूर : ‘संत्रानगरी’, ‘उपराजधानी’ आणि ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी विविध ओळख असलेल्या नागपूरच्या पर्यटन विकासाला आता शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने नागपूर जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, धार्मिक-सांस्कृतिक वारसा, निसर्गसंपदा आणि वन्यजीव पर्यटनाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटन धोरण-२०१६ अंतर्गत नागपूरला यापूर्वीच ‘विशेष पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले होते. जिल्ह्याचे आर्थिक तसेच गैरआर्थिक महत्त्व विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नागपूरची वाढती पर्यटन क्षमता, भौगोलिक स्थान आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लक्षात घेता स्वतंत्र पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

पर्यटनातून रोजगार आणि आर्थिक विकासाला बळ-
नागपूरच्या पर्यटन क्षमतेचा व्यापक विकास करणे, पर्यटकांची संख्या वाढवणे आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांच्या आदेशात स्थानिक आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राचा विस्तार झाल्यास हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, स्थानिक खाद्यपदार्थ, पर्यटक मार्गदर्शक, हस्तकला, लोककला तसेच अन्य पर्यटनपूरक व्यवसायांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोंड-भोसलेकालीन वारशाची समृद्ध परंपरा-
नागपूरच्या पर्यटनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ऐतिहासिक वारसा. गोंड राजे आणि भोसले राजघराण्यांच्या काळात नागपूर हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि प्राचीन स्थळे आजही या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात.इतिहासासोबतच ‘संत्रानगरी’ म्हणून नागपूरला मिळालेली आंतरराष्ट्रीय ओळख आणि जिल्ह्याला लाभलेले नैसर्गिक वैभवही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

‘टायगर कॅपिटल’मुळे वन्यजीव पर्यटनाला मोठी संधी-
वन्यजीव पर्यटनाच्या बाबतीत नागपूरचे स्थान विशेष आहे. ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या आसपास पेंच राष्ट्रीय उद्यान तसेच उमरेड-कऱ्हांडला यांसारखी महत्त्वाची वनक्षेत्रे आहेत.

Advertisement

देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून येणाऱ्या वन्यजीवप्रेमींसाठी नागपूर हे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाल्याने या क्षेत्राचा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे.

रामटेक, दीक्षाभूमीसह धार्मिक-सांस्कृतिक पर्यटन-
नागपूर जिल्ह्याची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखही तितकीच समृद्ध आहे. रामटेक येथील प्राचीन राम मंदिर, खिंडसी परिसरातील जलक्रीडा सुविधा आणि दीक्षाभूमी यांसारखी स्थळे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील निसर्गरम्य उद्याने, लोककला, हस्तकला आणि आदिवासी लोकनृत्यांची समृद्ध परंपरा सांस्कृतिक पर्यटनाला मोठी क्षमता प्रदान करते. त्यामुळे आगामी काळात नागपूर जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग, सांस्कृतिक आणि वन्यजीव पर्यटनाचा एकत्रित विकास करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.