
नागपूर : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब पेरल्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. आज १८ डिसेंबर २०२५ रोजी माननीय प्रधान न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर अनोळखी व्यक्तीकडून हा धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. संबंधित ई-मेलमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत स्फोट करण्याचा इशारा देण्यात आल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून पोलीस व बॉम्ब शोधक पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. परिसरात कुठेही संशयित अथवा बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधावा, तसेच अशा वस्तूंना कोणीही हात लावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने न्यायालयातील कर्मचारी, वकील, पक्षकार व नागरिकांनी सुरक्षारक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तपासणी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, धमकी देणाऱ्या ई-मेलच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी सायबर विभागाकडून तपास सुरू असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.








