नागपूर : दीक्षाभूमी येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेची सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील ४० वर्षीय कल्पना श्रावण जमधाडे या २० ऑक्टोबर रोजी कुटुंबासह दीक्षाभूमी येथे दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या परिसरातील स्टॉलजवळ पोहोचल्या असता त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तुटली. त्यामुळे त्यांनी ती सोनसाखळी आपल्या पर्समध्ये ठेवली.
काही वेळाने पर्स तपासली असता त्यातील सुमारे दोन तोळे वजनाची आणि अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दीक्षाभूमी परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




