अमरावती : बडनेरा येथील झिरी परिसरातील श्रीश्री हनुमान मंदिरात चोरीची मोठी घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील हनुमानजींचे चांदीचे मुखवटे, मुकुट, गदा आणि छत्र, तसेच श्याम बाबांचे चांदीचे छत्र चोरून नेले. चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंचे एकूण वजन सुमारे ७ किलो ७०० ग्रॅम असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात चोरी झाली तेव्हा तेथील चौकीदार सुट्टीवर होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे दागिने आणि धार्मिक वस्तूंवर हात साफ केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
चोरीचा तपास करण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील परिस्थितीची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.या चोरीमागे कोणाचा हात आहे, याचा शोध बडनेरा पोलीस घेत आहेत. मंदिरातील मौल्यवान चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.




