Published On : Tue, Sep 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अंधारात घडला दुर्दैवी अपघात;उकळत्या पाण्याने भाजलेल्या ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Advertisement

नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर, अंबाटोली परिसरात वीजपुरवठा खंडित असताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात ८ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेजस्विनी आहके असे मृत मुलीचे नाव आहे. उकळत्या पाण्याने तिचे सुमारे ६६ टक्के शरीर भाजले होते. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी ही अशोकनगर येथील अंबाटोली परिसरात कुटुंबासह राहत होती. घटनेच्या दिवशी ती बाथरूममध्ये गेली होती. त्याचवेळी अचानक वीज गेल्याने बाथरूमसह परिसरात अंधार झाला. बाथरूममध्ये उकळत्या पाण्याने भरलेली बादली ठेवण्यात आली होती. अंधारामुळे ती बादली तेजस्विनीला दिसली नाही.

बाथरूममध्ये जात असताना तिचा पाय बादलीला लागला आणि ती खाली पडली. यामुळे बादलीतील उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. या घटनेत ती गंभीररीत्या भाजली. तिच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली आणि तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

६६ टक्के शरीर भाजल्याने प्रकृती गंभीर-
वैद्यकीय तपासणीत तेजस्विनीच्या शरीराचा सुमारे ६६ टक्के भाग भाजल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणावर भाजल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.चिमुकलीच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेमुळे अंबाटोली परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

जरीपटका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद-
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जरीपटका पोलिसांनी तपास सुरू केला. तेजस्विनीचे वडील तेजस आहके (४०) यांच्या जबाबावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वीजपुरवठा खंडित असताना अंधारात उकळत्या पाण्याने भरलेल्या बादलीला धडक लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.