
फिर्यादीने 15 जुलै 2025 रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं की, 02 जुलै सकाळी 11 वाजता ते 03 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत, त्यांना टेलिकॉम विभाग दिल्ली, मुंबई पोलीस, सुप्रीम कोर्ट अशा विविध सरकारी संस्थांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून धमकावण्यात आलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आहे, तुम्हाला डिजिटली अरेस्ट केलं जात आहे, असं सांगून भीती निर्माण करण्यात आली आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात 23.71 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आलं.
तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 57/2025 नोंदवून विविध भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान फसवणुकीसाठी वापरलेलं Bank of Maharashtra, शाखा पुरी (ओडिशा) येथील खाते क्रमांक 60538001303 शोधण्यात आलं. या खात्याचा मालक रंजनकुमार विष्णुचरण पटनाईक (वय 60, रा. नाऊगाव, ओडिशा) याचा दिलेल्या पत्त्यावर शोध घेतला असता तो मिळून आला नाही. संबंधित खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही बंद होता.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध भुवनेश्वर येथे घेण्यात आला आणि 05 ऑगस्ट 2025 रोजी त्याला अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता 11 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील गोठविण्यात आलेले 19,90,392.98 रुपये न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस परत करण्यात येणार आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त मा. रविंद्र सिंघल, सहआयुक्त मा. नविनचंद रेड्डी, गुन्हे विभागाचे अति. आयुक्त, सायबर विभागाचे पोलिस उपआयुक्त लोहीत मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे, पो.ना. विनोद तोंडफोडे, पो.शि. रिंकेश ठाकूर यांनी केला.
सायबर पोलिसांच्या या वेळीच्या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे फसवणुकीचा बळी ठरलेल्या नागरिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.








