Published On : Sat, Nov 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील गुन्हेगारीचा पोलिस आयुक्तांकडून लेखाजोखा; हुडकेश्वर पोलिस ठाणे आघाडीवर!

Advertisement

नागपुरातील गुन्हेगारीचा पोलिस आयुक्तांकडून लेखाजोखा; हुडकेश्वर पोलिस ठाणे आघाडीवर!

नागपूर : उपराजधानीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कामकाजाची आकडेवारी तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील ३५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांतील गुन्ह्यांची संख्या आणि नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला केलेल्या कॉल्सची माहिती तपासण्यात आली. या आढाव्यात हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालानुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४०३ गुन्हे नोंदवण्यात आले असून, हा परिसर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कळमना येथे ३३३, गिट्टीखदानमध्ये ३२४, जरीपटका येथे ३२६ आणि यशोधरानगरमध्ये ३११ गुन्हे घडले आहेत. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही २६२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या भागांमध्ये नागरिकांनी पोलिस मदतीसाठी नियंत्रण कक्षाला मोठ्या प्रमाणात संपर्क साधल्याचेही आकडेवारीतून दिसून आले.

दुसरीकडे, जुनी कामठी आणि शांतीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तुलनेने कमी गुन्हे नोंदवण्यात आले. जुनी कामठीमध्ये ७६, शांतीनगरमध्ये ९३, सोनेगावमध्ये ९०, तर भांडेवाडीमध्ये १०८ गुन्हे घडले. सक्करदरा येथे १४६ आणि कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत पोलिस आयुक्तांनी गुन्ह्यांची संख्या, नागरिकांचे मदतीसाठी येणारे कॉल्स आणि पोलिस यंत्रणेचा प्रतिसाद या बाबींचा अभ्यास केला आहे. कोणत्या परिसरात कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे, याची कारणमीमांसा करून संबंधित पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र उपाययोजना आखल्या जाणार आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.