
नागपूर : पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागपूर क्राइम ब्रँचने शहरातील १७ कॅफेंवर ८ ऑक्टोबर रोजी छापेमारी केली. या कारवाईत २० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत अधिसूचना जारी केली होती. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी क्राइम ब्रँचच्या विविध पथकांनी शहरातील कॅफे, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांची तपासणी केली. या वेळी आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पार्टनर्स कॅफे, कॅफे ओ’ब्लिस, सी३ कॅफे कल्चर क्लब, स्क्वेअर बकेट कॅफे, कॅफे बाइट्स, कॅफे डॉट कॉम, कॅफे एल्वोरा, मिलियन डॉलर कॅफे, टू चेअर्स कॅफे, ईट अँड बाइट कॅफे, ईगल कॅफे अँड रेस्टॉरंट, द केकेज कॅफे, कॅफे क्रू विंग्स, टीओएफ कॅफे, कॅफे एनईएस, लिओपोल्ड कॅफे आणि टीसीएच कॅफे या आस्थापनांचा समावेश आहे.
या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. शहरातील आस्थापनांनी पोलीस आयुक्तांच्या आदेशांचे पालन करावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.



