नागपूर : शहरातील जामठा स्टेडियमवर येत्या ६ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे. तीन सामन्याच्या या शृंखलेतील पहिलाच सामना नागपूरमध्ये होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह असून यादिवशी हजारो लोक हा सामना पाहण्यासाठी जामठा स्टेडियमवर गर्दी करतील. यापार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी नागपूर वाहतूक विभागाने कंबर असली आहे. डीसीपी अर्चित चांडक यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
डीसीपी अर्चित चांडक यांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन –
जामठा स्टेडियमवर पोहोचण्यासाठी नागरिकांनी शक्यतोर स्वतःच्या खाजगी वाहनांचा वापर न करता खापरी पर्यंत सार्वजनिक वाहनांनी पोहोचावे,असे आवाहन डीसीपी अर्चित चांडक यांनी केले आहे. खापरीपासून सर्व नागरिकांसाठी जामठा स्टेडियम पर्यंत निशुल्क वाहतूक व्यवस्था करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. यासोबतच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 550 वाहतूक पोलीस तैनात करण्यात आल्याचे ते म्हणाले. यादिवशी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही चांडक म्हणाले. यादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असल्याचेही चांडक म्हणाले.
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय सामना संदर्भात मार्गदर्शक सूचना-
1. सर्व वाहनांनी जामठा टी पॉइंटपर्यंत नागपूर वर्धा रोड मार्गाचा अवलंब करावा.
2. स्टेडियमच्या अगदी समोर असलेल्या पार्किंग B, D1 आणि D2 साठी चारचाकी वाहनांच्या पार्किंगची जागा निश्चित केली आहे. पार्किंग जागा E आणि F मध्ये अतिरिक्त जागा दिली आहे.
3. B, D1, D2 मध्ये पार्क केलेल्या चारचाकी वाहनांनी सामना संपल्यानंतर फक्त नियुक्त केलेल्या बाहेर पडण्याच्या मार्गाचा वापर करावा.
4. स्टेडियमच्या शेजारी असलेल्या पार्किंग C म्हणून दुचाकी वाहनांच्या पार्किंगची जागा राखीव आहे. जर ती जागा भरली तर पार्किंग F मध्ये अतिरिक्त जागा दिली जाईल.
5. एकदा पार्किंग जागा B, C, D1, D2 75% भरली की सर्व वाहने जामठा टी पॉइंटवरून वर्धा रोडकडे पुढील दोन पार्किंग जागा पार्किंग आणि F- कडे वळवली जातील जी जामठापासून सुमारे 1 किमी अंतरावर आहेत. टी-पॉइंट, ये-जा करण्यासाठी बसेस आणि पार्किंग स्पेसपासून जामठा टी पॉइंटपर्यंत धावतील.
6. शेवटच्या क्षणी होणाऱ्या वाहतुकीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी प्रवाशांना सामना सुरू होण्याच्या किमान २ तास आधी स्टेडियममध्ये पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
7. प्रवाशांना वेळ वाचवण्यासाठी आणि वाहतुकीमुळे होणारा विलंब वाचवण्यासाठी खापरी स्टेशनपर्यंत (जिथून स्टेडियमपर्यंत बसेस येतील) मेट्रो सेवांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
8. संपूर्ण मार्गावर आणि पार्किंगच्या जागांवर वाहतूक पोलिस तैनात केले जातील आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी विविध फलक लावले जातील.
9. प्रेक्षकांच्या सोयीसाठी आणि सुरळीत वाहतूकीसाठी, जड वाहनांची वाहतूक नागपूर वर्धा महामार्गावरून समृद्धी महामार्गाकडे वळवली जाईल.
10. महामार्गावरील संपूर्ण मार्गावर, स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला 5 टोइंग व्हॅन कार्यरत असतील. म्हणून कृपया रस्त्यावर कोणतीही वाहने पार्क करू नका कारण ती ओढून नेली जातील.
सामना शांततेत पार पडावा आणि सर्व प्रेक्षकांसाठी स्टेडियममध्ये ये-जा करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांना तुमच्या प्रामाणिक आणि प्रेमळ सहकार्याची अपेक्षा आहे.