नागपूर : येत्या ६ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान होणार आहे. तीन सामन्याच्या या शृंखलेतील पहिलाच सामना नागपूरमध्ये होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे.
दोन्ही संघातले खेळाडू नागपुरात दाखल झाले असून विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही संघांनी समोवारी सराव सत्रात भाग घेतला. सोमवारी टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांनी नेटवर सराव करत घाम गाळला.
यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यांसारखे मोठे खेळाडू होते. दरम्यान, रवींद्र जडेजाने गोलंदाजीचा सराव केला. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ नागपूरला पोहोचले आहेत.
नागपूर विमानतळावर खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. कडक सुरक्षा व्यवस्थेत, दोन्ही संघ विमानतळावरून थेट आपापल्या हॉटेल्सकडे रवाना झाले. भारतीय संघ रेडिसन ब्लू येथे थांबला असून इंग्लंड संघ ले मेरिडियन हॉटेलमध्ये थांबला आहे.
दोन्ही ठिकाणी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. आज म्हणजे मंगळवारी दोन्ही संघ विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सराव सत्रात भाग घेतील. या काळात फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये धोरणात्मक तयारी केली जाईल.