Published On : Tue, Jul 2nd, 2019

नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली.

सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाषण करताना बऱ्याच नेत्यांनी निवडणूक काळात कॉंग्रेसच्या प्रचार प्रणालीतील त्रुटींवर बोट ठेवले. माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी तर पूर्व नागपुरातील एका ब्लॉक अध्यक्षाने बूथ कार्यकर्त्यांच्या निधीमध्येच गडबड केल्याचा आरोप केला. यात त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र पूर्व नागपुरातच काम पाहणाºया एका महिला ब्लॉक अध्यक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. हुसेन यांचे भाषण सुरू असतानाच ही महिला कार्यकर्त्यांमधून उठून संतापानेच थेट मंचावरच गेली व हुसेन यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. हुसेन यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. अखेर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता प्रामुख्याने दिसून आली.

या मेळाव्याला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश महासचिव डॉ.बबन तायवाडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, माजी शहराध्यक्ष शेख हुसैन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.