विदर्भात नागपूर सर्वात थंड; पारा १३ अंशावर
नागपूर : विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यांतील थंडी हळूहळू वाढत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये नागपुरातील तापमान ४.१ अंशाने घटले आहे. शुक्रवारी नागपूरमधील किमान तापमान सामान्यापेक्षा एक अंशाने कमी म्हणजे १३ अंश सेल्सियस होते. संपूर्ण विदर्भात हे सर्वात कमी तापमान आहे. असे असले तरी कडाक्याची थंडी अद्याप पडली नाही.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येणाऱ्या दोन-तीन दिवसामध्ये पारा आणखी दोन अंशाने खाली उतरू शकतो. त्यामुळे डिसेंबरमध्ये थंडीचा खरा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भात कमाल तापमान सामान्यापेक्षा १ ते ३ अंशाने जास्त आहे. परंतु, रात्र होताच पारा सामान्यापेक्षा २ अंशापर्यंत खाली उतरतो. शुक्रवारी ३३.६ अंश सेल्सियस एवढे सर्वाधिक जास्त तापमान अकोला व ब्रह्मपुरी येथे होते.
डिसेंबरमध्ये हुडहुडी
आॅक्टोबरमध्ये किमान तापमान १४ अंशावर पोहोचले होते. नोव्हेंबरमध्ये पारा सामान्य तापमानाच्या खाली आला आहे. येत्या तीन दिवसात पारा ११ अंशावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीमध्ये शहरातील नागरिकांना हुडहुडी भरविणारी थंडी अनुभवायला मिळू शकते.
हरभरा, गहू पिकासाठी थंडीची गरज
विदर्भात कोरडवाहू हरभरा, तेलबिया पिकांसह गहू पीक घेतले जाते. यातील हरभरा पिकाला थंडीची गरज असते. समप्रमाणात थंडी असल्यास या पिकाची वाढ होते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने थंडीची नितांत गरज असल्याने शेतकरी चांगल्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
शहरातील तापमान
तारीख तापमान
२० नोव्हेंबर १७.१
२१ नोव्हेंबर १६.६
२२ नोव्हेंबर १४.५
२३ नोव्हेंबर १३.०