नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरात चार दिवसांपासून फरशीच्या अरुंद भेगेत अडकलेल्या विषारी नागाची सर्पमित्राने धाडसी बचाव मोहीम राबवत सुटका केली. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नागाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही घटना मनीषनगरमधील रेवतीनगर परिसरातील हरियर हॉस्पिटलच्या मागील भागात घडली. येथील फरशीच्या अरुंद भेगेत एक विषारी नाग चार दिवसांपासून अडकून पडला होता. स्थानिक नागरिक वैभव चकोले यांनी याची माहिती सर्पमित्र शुभम पराळे यांना दिली. माहिती मिळताच शुभम पराळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
नाग फरशीखालील अतिशय अरुंद जागेत अडकला असल्याने त्याला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. अखेर सुमारे दोन तास मेहनत घेत कंक्रीट फोडून नागाची सुरक्षित सुटका करण्यात आली.
सुटकेनंतर नागाने मोठा उंदीर गिळल्यामुळे त्याचे पोट फुगले होते आणि त्यामुळेच तो भेगेत अडकून पडल्याचे समोर आले. चार दिवस अन्न-पाण्याविना अडकल्यामुळे तो अत्यंत अशक्त झाला होता.
सर्पमित्रांनी नागाला पाणी पाजून त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट सेंटरच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात नागाला देण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करून प्रकृती सुधारल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.





