Published On : Sat, Mar 6th, 2021

नागपूर शहरातील निर्बंधात १४ मार्चपर्यंत वाढ; शनिवार, रविवार पूर्णत: बंद

नागपूर : कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एका आदेशाद्वारे शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था बंद करण्यासोबतच अनेक आस्थापनांवर आणि लग्न कार्य आयोजनावर निर्बंध घातले होते. हेच निर्बंध आता १४ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे एका आदेशाद्वारे त्यांनी जाहीर केले.

या आदेशानुसार, नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या संस्थांद्वारे ऑनलाईन स्वरूपात कामकाज सुरु ठेवता येईल. तसेच राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन स्तरावरील पूर्वनियोजित परिक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील. नागपूर शहर सीमेत कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नागपूर शहरातील संबंधित सभागृह, मंगल कार्यालय, लॉन या ठिकाणी होणारे लग्न समारंभाच्या आयोजनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नागपूर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह, दुकाने व इतर संस्थाने रात्री फक्त ९ वाजतापर्यंत एकूण क्षमतेच्या ५० टक्के पर्यंत सुरु ठेवता येतील. प्रत्यक्ष डायनिंग सुविधा रात्री फक्त ९ वाजतापर्यंत सुरू राहील. मात्र, होम डिलिव्हरी व त्यासाठी रात्री ११ वाजतापर्यंत स्वयंपाकगृह सुरू ठेवता येईल. नागपूर महानगरपालिका हद्दीतील परिक्षार्थ्यांच्या अभ्यासासाठी वापरात असलेले सर्व वाचनालय, अध्ययन कक्ष एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतक्या क्षमतेच्या मर्यादेने सुरू ठेवता येतील. स्विमींग पूल बंद राहतील. क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील. मात्र, नियमित सरावास परवानगी राहील.

१४ मार्चपर्यंत शनिवारी व रविवारी खालील सेवा, आस्थापना सुरू राहतील
वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा, दूध विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, पेट्रोल पंप, गॅस एजंसी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा दुकाने (फक्त स्टॅण्ड अलोन स्वरूपातील), चिकन, मटन, अंडी व मांस दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने/ वर्क शॉप, पशु खाद्य दुकाने/वर्कशॉप, पशु खाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहील.

१४ मार्चपर्यंत शनिवारी व रविवार काय बंद राहील
दुकाने, मार्केट, मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेल, रेस्टॉरेंट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील. मात्र होम डिलिव्हरी व त्यासाठी किचन रात्री ११ वाजतापर्यंत सुरू राहू शकतील.), सर्व खासगी कार्यालय, सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये वगळून).

जबाबदारी ओळखा, बंद पाळा : महापौरांचे आवाहन
कोव्हिडचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता त्यावर नियंत्रण आणणे ही प्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारी आहे. प्रशासनाने ७ मार्चपर्यंत निर्बंध जाहीर केल्यानंतर मागील शनिवार आणि रविवारी संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. शिवाय नागरिकांनीही घरी राहण्याचे आवाहन केले होते. व्यापाऱ्यांसह सर्व आस्थापनांनी या आदेशाचे पालन करीत नागरिकांनीही आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल नागपूरकर अभिनंदनास पात्र आहेत. हा आदेश ६ आणि ७ मार्च रोजीही कायम असून या आदेशाचे पालन करावे. जीवनावश्यक वस्तूंसोबतच मांस, मटनची दुकानेही सुरू ठेवण्याची विनंती लक्षात घेता येत्या शनिवारी, रविवारी ही दुकाने सुरू राहतील. नागरिकांनीही गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.