नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर शहर भाजपमध्ये फेरबदल होत आहेत. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या जागोवर आता माजी महापौर प्रवीण दटके यांची वर्णी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दटके यांना शनिवारी मुंबईला बोलावून घेतले.
दटके हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. भाजपच्या यंग ब्रिगेडचे ते आघाडीचे शिलेदार आहेत. दटके यांनी महापौरपदासह महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदही भूषविले आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेची धुराळी सांभाळली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दटके यांनी मध्य नागपूरच्या तिकीटावर दावा केला होता. मात्र, तिकीट न मिळाल्यानंतरही त्यांनी संयम बाळगला. यावेळीही ते पुन्हा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शहर अध्यक्षपद मिळाल्यास विधानसभेचे तिकीटही मिळेल का, असा प्रश्न आहे.
सुधाकर कोहळे हे दक्षिण नागपूरचे आमदार आहेत. त्यांच्याकडे शहर अध्यक्षपदही होते. निवडणुकीच्या तोंडावर ‘एक व्यक्ति एक पद’ हा फार्म्युला लागू करीत कोहळे यांना प्रचारासाठी मोकळे करणे हे देखील या बदलामागील एक कारण असेल, असे सांगितले जात आहे.