नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या शपथग्रहण समारंभानंतर नागपुरात भाजपातर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह दिसून येत होता. भाजपाच्या गणेशपेठ येथील शहर कार्यालयासमोर आतषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचेदेखील वाटप झाले.
शपथविधी झाल्यावर लगेच ढोलताशे वाजविण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. भाजपाच्या कार्यालयात शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. यावेळी आमदार, नगरसेवक यांच्यासह पक्ष पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी भाजपाचे विदर्भ प्रांत संघटनंत्री उपेंद्र कोठेकर, आ.अनिल सोले,आ.मिलिंद माने, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यासह श्रीकांत देशपांडे, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, गुड्डू त्रिवेदी, प्रमोद पेंडके, अर्चना डेहनकर, देवेन दस्तुरे, शिवानी दाणी, जयप्रकाश गुप्ता, नवनीतसिंह तुली, चंदन गोस्वामी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, मनीषा काशीकर, संजय ठाकरे, किशन गावंडे, महेंद्र कटारिया, प्रताप मोटवानी, डॉ. विंकी रुघवानी, बापू चिखले, गजेंद्र पांडे इत्यादी उपस्थित होते. बडकस चौकातदेखील थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती व तेथेदेखील कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.
१ जून रोजी गडकरींचा सत्कार
दरम्यान, शपथविधी समारंभाच्या अगोदर शहर भाजपाची विशेष बैठक बोलविण्यात आली. १ जून रोजी नितीन गडकरी यांचे शहरात आगमन होणार आहे. यावेळी भाजपातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे यात निश्चित झाले. बैठकीला भाजपाच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य, मंडळ व विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महामंत्री सहभागी झाले होते. १ जून रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येणार आहे. तसेच श्रमपरिहार, आरोग्य शिबिर व धार्मिक कार्यक्रमदेखील होतील, असे पक्षाचे महानगर प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी यांनी सांगितले.